Agriculture Farming

शेतकऱ्यांच्या ‘मसिहा’चा गौरव

बिहारमधील चंपारण जिल्ह्यातील समौता गावामध्ये एक आगळावेगळा समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभामध्ये भात उत्पादकांनी फिलिपिन्स येथील आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्रातील पैदासकार आणि “सब-1′जनुकाचे संशोधक डॉ. डेव्हिड मॅकील यांचा सत्कार केला. या सत्काराचे कारण म्हणजे भाताची “स्वर्ण-सब-1′ ही जात या पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या जीवनात आशेचा किरण घेऊन येणारी ठरली.
बिहारमधील चंपारण या जिल्ह्यात दरवर्षी पुराच्या पाण्याचा फटका भात शेतीला बसतो, त्यामुळे भात शेतीचे नुकसान हे ठरलेले; परंतु या भागातील शेतकऱ्यांना भात लागवडीशिवाय पर्याय नाही. त्यामुळे हे शेतकरी पुराच्या पाण्यात तग धरून राहील अशा जातीच्या शोधात होते. गेल्यावर्षी पुसा येथील (बिहार) राजेंद्र कृषी विद्यापीठाने चंपारण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना “स्वर्ण-सब-1′ ही जात लागवडीसाठी उपलब्ध करून दिली. चंपारण जिल्ह्यात दरवर्षी किमान आठ ते 12 दिवस पुराचे पाणी शेतामध्ये थांबून राहते, त्यामुळे भात रोपे कुजून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते; परंतु गेल्यावर्षापासून शेतकऱ्यांनी “स्वर्ण-सब-1′ या जातीची लागवड पूरग्रस्त भागात सुरू केली. ही जात पुराच्या पाण्यात तग धरून राहिली, तसेच पूर ओसरल्यानंतर रोपांची चांगली वाढ झाली. शेतकऱ्यांना या जातीपासून प्रति हेक्‍टरी सरासरी पाच ते सहा टन उत्पादन मिळाले. या जातीच्या तांदळाचा दर्जा चांगला आहे, त्याचबरोबरीने भातही लवकर शिजतो, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. त्यामुळे “स्वर्ण-सब-1′ ही जात शेतकऱ्यांमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे. त्यामुळे या जातीच्या संशोधकाला भेटण्याची शेतकऱ्यांची इच्छा हाती, ती यंदाच्या एप्रिल महिन्यात पूर्णही झाली.
एप्रिल महिन्यात डॉ. मॅकील हे भारतातील संशोधन केंद्रांच्या दौऱ्यावर होते. हे शेतकऱ्यांना कळल्यावर त्यांनी राजेंद्र कृषी विद्यापीठातील तज्ज्ञ डॉ. जे. पी. सिंग यांच्या माध्यमातून भेटीचे आमंत्रणही दिले. शेतकऱ्यांच्या विनंतीला मान देत डॉ. मॅकील 8 एप्रिल रोजी समौता गावात दाखलही झाले.
या वेळी चंपारण जिल्ह्यातील सुमारे साठ शेतकऱ्यांनी एकत्र येत खास समारंभात डॉ. मॅकील यांचा “शेतकऱ्यांचा मसिहा’ म्हणून गौरव केला. या वेळी शेतकऱ्यांनी “स्वर्ण-सब-1′ या जातीच्या लागवडीचे अनुभव, तसेच भात शेतीमधील अडचणी सांगितल्या. शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन भाताच्या जातींच्या निर्मितीमध्ये तशा पद्धतीने संशोधन सुरू असल्याची ग्वाही डॉ. मॅकील यांनी दिली.

पुरात तग धरणारी “स्वर्ण-सब-1′
आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्रातील पैदासकार डॉ. मॅकील यांनी पुराच्या पाण्यातही तग धरून राहणाऱ्या “स्वर्ण-सब-1′ या जातीची निर्मिती केली. ज्या ठिकाणी दरवर्षी पुराचे पाणी आठ ते 10 दिवस साचून राहते, त्या भागात या जातीची लागवड फायदेशीर दिसून आली आहे. जगभरातील पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना या जातीच्या लागवडीमुळे शाश्‍वत उत्पादनाची खात्री मिळणार आहे.

Comments are closed.